नाशिक- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सहाशेच्यावर नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा पंधरा हजार पार गेला आहे. तर दिवसभरात नाशिक शहरातील सहा जणांचा या आजाराने बळी घेतल्याने जिल्ह्यातील मृतांचा एकूण आकडा देखील ५०५ वर गेला आहे. तसेच शनिवारी २१७ जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.
महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्याने कोरोनाबाधित संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. शनिवारी, नाशिक शहरात सर्वाधिक ३९७, ग्रामीण भागात १ हजार ७८ तर मालेगावात २८ अशाप्रकारे ६०३ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
एकीकडे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव अधिक वेगाने होऊ लागला आहे. कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाच्या मालेगावातील कोरोनाबाधितांचा आकडा देखील वाढल्याने या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजार ५७ वर गेला आहे. यात नाशिक महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ९ हजार ८०८, नाशिक ग्रामीणमध्ये ३७१४, मालेगाव महापालिका हद्दीत १३३५ तर जिल्हाबाह्य १६२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ११ हजार ३४४ जण उपचाराअंती पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी देखील परतले आहेत.