मोदींचा "बडबोल्यां"साठीचा "राम बाण" नेमका कोणासाठी ?
राम मंदिरावरून हल्ला बोल करताना मोदीचा रोख नक्की कोणाकडे होता याची चर्चा सध्या राजकिय वर्तूळात सुरू आहे. उत्तर प्रदेशातील एका भाजपच्या मंत्र्यांने सर्वोच्च न्यायालयही आमचेच आहे. त्यामुळे राममंदीराचा निर्णयही आमच्या बाजूनेच लागणार असे वक्तव्य केले होते. तर काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काश्मीर प्रमाणेच राममंदिराचाही निर्णय घ्या असे वक्तव्य केले होते
नाशिक - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल नाशिकमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजवले. अपेक्षेप्रमाणे त्यांनी विरोधाकांचा खरपूस समाचारही घेतला. गेल्या दोन तीन आठवड्यांपासून काही बडबड करणारे लोक राममंदिराविषयी काहीही बरळत आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवायला हवा. असं वक्तव्य करत त्यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही, अशी जोरदार चर्चा आहे.
राम मंदिरावरून हल्लाबोल करताना मोदीचा रोख नक्की कोणाकडे होता याची चर्चा सध्या राजकिय वर्तूळात सुरू आहे. उत्तर प्रदेशातील एका भाजपच्या मंत्र्यांने सर्वोच्च न्यायालयही आमचेच आहे. त्यामुळे राममंदीराचा निर्णयही आमच्या बाजूनेच लागणार असे वक्तव्य केले होते. तर काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काश्मीर प्रमाणेच राममंदीराचाही निर्णय घ्या असे वक्तव्य केले होते. शिवाय राम मंदिराची पहिली विट रचण्यासाठी शिवसैनिकांना सज्ज रहाण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मोदींनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
राम मंदिराबाबत स्फोटक वक्तव्य करणाऱ्या आपल्याच पक्षातील मंत्र्यांचे कान टोचण्यासाठी मोदींनी महाराष्ट्राचे व्यासपीठ का निवडले हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. एकीकडे त्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्याला फटकारण्याचे काम केले. तर दुसरीकडे त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या टिकेचा बाण शिवसेनेकडेही सोडला. त्यामुळे मोदींनी राम मंदीर प्रकरणी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची जोरदार चर्चा आहे.