नाशिक- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नाशिक पोलिसांनी जमावबंदी कायदा लागू केला आहे. याअंतर्गत शालिमार येथील सोनी गिफ्ट या दुकानाच्या मालकाविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम 188प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या दुकानात महिला दिनानिमित्त काही वस्तूंवर 50 टक्के सूट दिल्याने इथे महिलांची कालपर्यंत (सोमवार) मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
नाशिक शहरात कोरोनासदृश रुग्ण मिळून आल्याने सर्वच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सरकारकडूनदेखील 31 मार्चपर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालय, मॉल, व्यायामशाळा, चित्रपटगृह, नाट्यगृह, उद्याने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतरही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शालिमार भागातील सोनी गिफ्ट या कॉक्रीच्या शोरूममध्ये महिला दिनानिमित्त प्लस्टिक आणि काचेच्या वस्तूंवर 50 टक्के सूट दिल्याने इथे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.