नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दीड वर्षानंतर नाशिक दौरा होत आहे. त्यांचे शुक्रवारी शहरात आगमन झाले. त्यांचे माजी महापौर अशोक मुर्तडक व अन्य पदाधिकाऱ्यांनी हॉटेल एक्स्प्रेस इन येथे स्वागत केले आहे. राज ठाकरे येथेही तोंडावर मास्क न घालताच दाखल झाले आहेत.
राज ठाकरे यांचा नाशिक दौरा नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असताना राज ठाकरे सातत्याने नाशिक दौऱ्यावर येत होते. परंतु, शुक्रवारी दीड वर्षानंतर उदयनराजे भोसले यांच्या मामेभावाच्या विवाह समारंभाला हजर राहण्यासाठी राज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, येथे आल्यानंतर राज ठाकरे यांनी मास्क घातलेल्या माजी महापौर अशोक मुर्तडक यांना मास्क काढून टाकण्याचा इशारा केला.
राज यांच्या विना मास्क एंट्रीवर प्रशासन काय भूमिका घेणार, हे बघणे महत्त्वाचे
नाशिकमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. मात्र, राज यांनी स्वत: मास्कचा वापर केलेला नव्हता. ते तसेच कार्यकर्त्यांशी संपर्क करत संवाद साधत होते. तसेच, त्यांनी माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही मास्क काढून ठेवण्याचा इशारा केला. राज ठाकरे यांनी मास्कचा वापर केला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
राज यांचा दौरा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा
राज यांच्या आगमनामुळे मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज ठाकरे यांचा हा दौरा महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भारतीय जनता पक्षाला मनसेने पाठिंबा देऊन आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठीचे संकेत दिले आहेत. महापालिकेत भाजपला मनसेची साथ मिळाली आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला खुले समर्थन दिल्याने युती अधिक घट्ट झाली आहे. त्यावर पुढील एक वर्षाची राजकीय वाटचाल कशी असेल, यावरही आजच्या दौऱ्यामध्ये चर्चा होणार असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले.