महाराष्ट्र

maharashtra

रोगप्रतिकारक क्षमतेसह देशभक्ती रुजवण्यासाठी सामूहिक योग व कवायतीचा उपक्रम कौतुकास्पद : कृषीमंत्री भुसे

By

Published : Oct 11, 2020, 6:19 PM IST

सेवानिवृत्तीनंतरही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मालेगावच्या माजी सैनिकांनी तालुक्यासह शहरातील प्रत्येक नागरिक सुदृढ व निरोगी राहण्यासाठी सामूहिक कवायत व योगाचा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे मनोगत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.

कृषीमंत्री दादाजी भुसे
कृषीमंत्री दादाजी भुसे

नाशिक - देशातील प्रत्येक नागरिक सुदृढ व निरोगी राहून कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावा. तसेच, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीबरोबरच देशभक्ती रुजविण्यासाठी माजी सैनिकांमार्फत राबविण्यात येणारा सामूहिक कवायत व योगाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज(रविवार) केले आहे.

शहरातील म.स.गा. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सामूहिक कवायतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सेवानिवृत्तीनंतरही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मालेगावच्या माजी सैनिकांनी तालुक्यासह शहरातील प्रत्येक नागरिक सुदृढ व निरोगी राहण्यासाठी देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत व योगाचा उपक्रम सुरू केला आहे. मागील एक महिन्यापासून त्यांनी या उपक्रमावर मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे. शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये या उपक्रमांचे प्रात्याक्षिक व प्रशिक्षण त्यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचे मनोधैर्य वाढून कोरोनाशी लढण्याची शक्ती मिळणार आहे. देशभक्तीपर गीतांवर आधारित या कवायती करताना प्रत्येकाच्या मनात देशभक्ती रुजवण्याचे कामही होणार आहे, असे भुसे म्हणाले.

शहरातील म.स.गा. महाविद्यालयाच्या प्रागंणात सकाळी 06:30 वाजता देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. शहरातील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. प्रत्येकाने मुखपट्टीचा वापर व सुरक्षित अंतर ठेवून या सामूहिक कवायतीमध्ये सहभाग नोंदवला. कोरोनाशी मुकाबला करताना मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये नैराश्याची भावना तयार झाली होती. आजच्या या कार्यक्रमामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद व देशभक्तीची भावना झळकताना दिसून आली, असे भुसे म्हणाले. माजी सैनिकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात शहरासह तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहनही मंत्री भुसे यांनी यावेळी केले.

हेही वाचा -नाशिक : संकटांना कंटाळून शेतकऱ्याने चार एकर द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड

ABOUT THE AUTHOR

...view details