महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, छगन भुजबळांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी - नाशिकमध्ये छगन भुजबळांची अधिकाऱ्यांना तंबी

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालयात कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. कोरोना परिस्थिती आटोक्यात न आल्यास पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी नियमात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलीच तंबी दिली.

nashik
आढावा बैठक घेताना पालकमंत्री

By

Published : Jul 11, 2020, 8:58 PM IST

Updated : Jul 11, 2020, 9:20 PM IST

नाशिक- येवला शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर पुढील आठ दिवसात नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले नाही, तर कठोर पाऊल उचलावी लागणार असून प्रसंगी लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. ज्या भागात पेशंट अधिक आहेत, अशा भागात संचारबंदी कडक करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. अधिकाऱ्यांनी आपापले काम चोख बजावण्याबाबत भुजबळांनी यावेळी अधिकाऱ्यांना तंबीही दिली.

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, छगन भुजबळांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, की येवला शहर व परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे अधिक लक्ष देण्याची गरज असून अधिकाऱ्यांनी त्याबाबत नियोजन करावे. अतिदक्षता म्हणून येवला शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना औषधे पुरवण्यात येत आहेत. तसेच सर्वेक्षण नियमितपणे सुरू ठेवण्यात येऊन कंटेनमेंट झोनमध्ये कडक नियोजन करण्यात यावे. मास्क न वापरणाऱ्या तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रसंगी पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहर व ग्रामीण भागातील ज्या परिसरात पेशंट सापडले आहेत. त्या भागात संचारबंदी कडक करण्यात येऊन त्या परिसरातील रुग्णांची नियमित तपासणी करुन त्यांना औषधे पुरवण्यात यावीत. लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना बाभूळगाव येथे पाठवण्यात यावे. ऑक्सिजन बेड्सवर डिसीएचसीमध्ये अतिदक्षता घ्यावयाच्या रुग्णांना ठेवण्यात यावे. त्यासाठी रुग्णांचे समुपदेशन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या.

नगरसूल येथे संपूर्ण २८ बेडला कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था करावी, त्याचबरोबर येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येवला शहरात कोरोनासोबतच इतर साथ रोगांचा पावसाळ्यात शिरकाव होऊ नये, यासाठी अतिदक्षता म्हणवून प्राधान्याने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन शहर नियमित स्वच्छ ठेवण्याचे आदेश नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.

यावेळी शेतकरी खरीप हंगाम पीक कर्जवाटप, मका खरेदी व खत वाटपाबाबत आढावा घेतला. त्यानुसार येवला तालुक्याला असलेल्या ८० कोटींच्या इष्टांकापैकी ३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. येवल्याला कर्जमाफीची १५० कोटी तर निफाड तालुक्याला १३३ कोटी रुपये रक्कम प्राप्त होणार असून ही संपूर्ण रक्कम पीककर्जासाठी वितरित करावी, अन्यथा जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

मका खरेदीसाठी गोडाऊन शिल्लक नसेल, तर तातडीने गोडाऊन भाड्याने घेऊन सर्व शेतकऱ्यांची मका खरेदी करावी, खरेदी प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी काट्यांची संख्या वाढवावी व खरेदी प्रक्रिया बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यासोबत काळाबाजार व लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश छगन भुजबळ यांनी यावेळी बैठकीत दिले.

Last Updated : Jul 11, 2020, 9:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details