महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत टेस्टिंग सुरूच ठेवा - छगन भुजबळ

'कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी देखील शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना तपासणी मोहीम सुरूच ठेवावी. शेतकऱ्यांच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात पीककर्जाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करा', असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

nashik
नाशिक

By

Published : Jun 13, 2021, 8:58 PM IST

येवला - कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी देखील शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना तपासणी मोहीम सुरूच ठेवावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. छगन भुजबळांच्या उपस्थितीत आज (13 जून) येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला, निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती उपाययोजना व विकास कामांची आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

'कोरोना टेस्टिंग सुरुच ठेवा'

'कोरोना रुग्णांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. मात्र अद्यापही आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना व कोरोना तपासणी नियमित सुरू ठेवावी. कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत उपाययोजना कायम सुरू ठेवाव्यात. तसेच रुग्णसंख्या कमी झाली म्हणून गाफील राहू नये. ऑक्सिजन जनरेशन प्लांटला तातडीने स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत', अशा सूचना भुजबळांनी यावेळी दिल्या.

'शहर स्वच्छता, गटार सफाई तातडीने पूर्ण करा'

'भविष्यात येवला शहरात लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असल्यास पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने साठवण तलावाचे नियोजन करण्यात यावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छता, गटार सफाई यासह आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत', अशाही सूचना भुजबळांनी केल्या.

'पीककर्जाचे वाटप करा'

'शेतकऱ्यांच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन करताना पीककर्जाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. शेतकऱ्यांना बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करावे. तसेच वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊन जास्तीत जास्त झाडे लावण्यात यावीत', असे आदेश भुजबळांनी दिले.

'रखडलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करा'

येवला दौऱ्यावर असताना आज छगन भुजबळ यांनी येवला शहर व तालुक्यात रखडलेल्या कामांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी येवला शहरातील शादिखाना, वाचनालय, पर्यटन विकास कामे, येवला शहर सुशोभीकरण, रस्ते यासह रखडलेली लोकउपयोगी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

येवला शिवसृष्टीसाठी जागेची पाहणी

येवला शहराच्या सौंदर्यात भर पाडणारा 'येवला शिवसृष्टी प्रकल्प' मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाची निविदाही काढण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज छगन भुजबळ यांनी शिवसृष्टी जागेची पाहणी केली. तसेच, याठिकाणी करावयाच्या कामांबाबत नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा -ठरलं..! ओबीसींच्या न्यायहक्कांसाठी शिबीर भरणार, तारीख आणि ठिकाणही ठरले

ABOUT THE AUTHOR

...view details