नाशिक - नाशिकमध्ये होणाऱ्या एक आंतरजातीय विवाह सोहळ्याला लव जिहादचा रंग देत समाजातून होणाऱ्या तीव्र विरोधामुळे विवाह रद्द करण्याची वेळ मुलीच्या परिवारावर आली. अशात या मुलीच्या कुटुंबाची मंत्री बच्चू कडू यांनी भेट घेत कुटुंबाला मानसिक आधार देत पाठिंबा दर्शवला. इतकेच नाही तर मी लग्नात येऊन नाचेल, असेही बच्चू कडू यांनी म्हणत आंतरजातीय विवाह सोहळ्याला विरोध करणाऱ्याला तंबी दिली.
नाशिकचा आसिफ आणि रसिका, "लव जिहाद"च्या आरोपांनी मोडले लग्न आसिफ आणि रसिकाची लग्न पत्रिका बच्चू कडूंनी दर्शविला पाठिंबा
हिंदू आणि मुस्लिम समाजात होणाऱ्या एका लग्नसोहळ्याची पत्रिका सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरते आहे. 18 जुलै रोजी नाशिकमध्ये पार पडणारा हा सोहळा खर तर सगळ्यांसाठीच एक आदर्श ठरणार होता. मात्र या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग देण्यात आल्याने तसेच काही धार्मिक कट्टरवाद्यांच्या धमक्यांमुळे हे लग्नच रद्द झाले आहे. दरम्यान आज मंत्री बच्चू कडू यांनी या कुटुंबाची भेट घेत पाठिंबाच दिला नाही तर लग्नाला उपस्थिती राहण्याचे आश्वासन देखील दिले.
काय आहे प्रकरण?
नाशिकमधील हिंदू कुटुंबातील रसिका आडगावकर या तरुणीचे मुस्लिम समाजातील आसिफ खान या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 21 मे रोजी नोंदणी पद्धतीने या दोघांनी लग्नही केले होते. विशेष म्हणजे संबंधित तरुणी ही दिव्यांग असतांनाही मुलाने कुठल्याही अटीशिवाय स्व-इच्छेने हे लग्न करण्याची तयारी दर्शवल्याने वधू कुटुंबीय देखील आनंदात होते. नोंदणी पद्धतीने विवाह तर झाला मात्र मुलीचे वडील एक नामांकित सराफ व्यावसायिक असल्याने हा सोहळा नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटामाटात करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही धर्माच्या कुटुंबातील सदस्यांची लग्नाबाबत झालेली बैठक यशस्वी होताच, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन हा सोहळा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत १८ जुलै २०२१ रोजी शहरातील तिडके कॉलनी परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये करण्याचे ठरले. मात्र लग्न पत्रिका छापणे हे या परिवारासाठी अडचणीचे ठरले. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होताच कट्टरवादी काही धार्मिक संघटनांनी हे लग्न म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला. लव्ह जिहादच्या नावाने ही पत्रिका व्हॉट्स ऍप तसेच फेसबुकच्या माध्यमातून जोरदार व्हायरल झाली. व्हॉट्स ऍपवर संबंधित पत्रिका आणि लव्ह जिहादचा मेसेज येताच अनेकांनी ते तसेच्या तसे पुढे फॉरवर्ड केले. मात्र यामुळे वधूकडील मंडळींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे मुलीच्या कुटुंबाला हे लग्न रद्द करावे म्हणून समाजातून दबाव वाढत गेल्याने हे लग्न रद्द करण्यात आले. दरम्यान नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री बच्चू कडू यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांना पाठिंबा तर दिलाच, मात्र धर्माच्या आड या कुटुंबाला त्रास देणाऱ्यांना तंबी दिली. तुम्ही लग्न करा मी दोन दिवस लग्नासाठी नाशिकला येतो. एवढेच नाही तर मी लग्नात नाचतो, असेही मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
'कुटुंबांनी आम्हाला समजून घेतलं'
या सगळ्या प्रकरणामुळे मोठा मनस्ताप झाला. मात्र परिवाराने आम्हाला समजून घेतल्याने आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया वर असिफ आणि वधू रसिकाने दिली आहे. प्रेमाला जात, धर्म नसतो असे म्हणतात, मात्र ज्यावेळी खरोखर आपल्या घरात आंतरधर्मीय विवाह ठरतो, तेव्हा अनेक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता समाजाने देखील जाती धर्माबाबत मानसिकता बदलण्याची नितातं गरज असल्याची भावना सर्वसामान्य व्यक्त केली आहे.
हेही वाचा -"अमरावतीचा नटरंग..." छक्क्या... बायल्या... तर कधी अश्लिल वर्तन... हा आहे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त स्वप्नील विधाते