नाशिक - 'माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रीमंडळात घेण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील. मी लहान माणूस, त्यावर काही बोलणार नाही. राजकारणात संघर्ष हा फक्त माध्यमांना दाखवण्यापुरता असतो. आतून मात्र सर्व एक असतात', असे धक्कादायक विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.
खटल्याच्या सूनवणीसाठी बच्चू कडू कोर्टात हजर
23 जुलै 2017 रोजी बच्चू कडू यांनी तत्कालीन पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगरल्याचा ठपका ठेण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी बच्चू कडू कोर्टात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
काय आहे प्रकरण?
अपंगांसाठी राखीव निधी खर्च न केल्यामुळे महानगरपालिकेचे माजी आयुक्त अभिषेक कृष्णा आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता. यावेळी कडू यांनी अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उचलल्याप्रकरणी न्यायालयामध्ये बच्चू कडू यांच्या विरोधात खटला चालू आहे. या खटल्यामध्ये मागील अनेक तारखांना बच्चू कडू गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध या प्रकरणी न्यायालयाने ककड वॉरंट काढले होते. यासाठी शुक्रवारी (16 जुलै) बच्चू कडू नाशिक न्यायालयात हजर राहिले होते.
'आघाडीतील तिन्ही पक्षात कोणताही वाद नाही'
'राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. विनाकारण त्याला काही व्यक्ती आणि काही संस्था हवा देत आहेत', असा स्पष्ट आरोप महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. प्रहार संघटनेच्या बैठकीसाठी बच्चू कडू नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की 'तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसतात. एकत्र निर्णय होतात. पक्षांचे मंत्री एकत्र काम करतात. सरकारविषयी बाहेर काही व्यक्ती आणि काही संस्था जाणून बुजून नागरिकांचे तसेच तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे मन विचलित करण्याचे काम करत आहेत. परंतु हे चुकीचे आहे. उद्या त्यांच्या बाबतीत असं कोणी केलं तर काय होईल? तिन्ही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही'.
'तो लव जिहाद नाही'
'नाशिकमध्ये एका प्रतिष्ठिताच्या घरी लव जिहादचा जो प्रकार झाला, तो लव जिहाद नाही. आम्ही त्या परिवारासोबत आहोत. कारण ती मुलगी अपंग आहे. आम्ही अपंगांसाठी काम करतो. आम्ही त्यांच्यासाठी वेळप्रसंगी लुढूदेखील', असे बच्चू कडूंनी म्हटले.
काय आहे लव जिहाद प्रकरण?
नाशिकमधील हिंदू कुटुंबातील रसिका आडगावकर या तरुणीचे मुस्लिम समाजातील आसिफ खान या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 21 मे रोजी नोंदणी पद्धतीने या दोघांनी लग्नही केले आहे. विशेष म्हणजे संबंधित तरुणी ही दिव्यांग असतानाही मुलाने कुठल्याही अटीशिवाय स्व-इच्छेने हे लग्न करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे वधू कुटुंबीय देखील आनंदात आहेत. नोंदणी पद्धतीने विवाह तर झाला, मात्र मुलीचे वडिल एक नामांकित सराफ व्यवसायिक असल्याने हा सोहळा नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटामाटात करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही धर्माच्या कुटुंबातील सदस्यांची लग्नाबाबत झालेली बैठक यशस्वी झाली. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन हा सोहळा मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत १८ जुलै २०२१ रोजी नाशिक शहरातील तिडके कॉलनी परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये करण्याचे ठरले. मात्र लग्न पत्रिका छापणे हे या परिवारासाठी अडचणीचे ठरले. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होताच कट्टरवादी काही धार्मिक संघटनांनी हे लग्न म्हणजे लव जिहादचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला. लव जिहादच्या नावाने ही पत्रिका व्हॉट्स ऍप तसेच फेसबुकच्या माध्यमातून जोरदार व्हायरल झाली. व्हॉट्स ऍपवर संबंधित पत्रिका आणि लव जिहादचा मेसेज येताच अनेकांनी ते तसेच्या तसे पुढे फॉरवर्ड केले. मात्र यामुळे वधूकडील मंडळींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे मुलीच्या कुटुंबाला हे लग्न रद्द करावे म्हणून समाजातून दबाव वाढत गेल्याने हे लग्न रद्द करण्यात आले.
लग्नाला बच्चू कडू राहणार हजर
मात्र, नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री बच्चू कडू यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांना पाठिंबा तर दिलाच. शिवाय, धर्माच्या आड या कुटुंबाला त्रास देणाऱ्यांना तंबीही दिली. 'तुम्ही लग्न करा. मी दोन दिवस लग्नासाठी नाशिकला येतो. एवढेच नाही तर मी लग्नात नाचतो', असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता १८ जुलैला होणाऱ्या लग्नाकडे आणि बच्चू कडूं नाचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -अनिल देशमुखांना धक्का : ईडीकडून 4.20 कोटींची मालमत्ता जप्त