मनमाड (नाशिक) - संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे महामारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, अचानक घ्याव्या लागलेल्या निर्णयामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यात आलेल्या परप्रांतीय मजुरांची स्थिती विदारक आहे. रोजगार बंद पडल्याने हजारो लोक पायीच गावाकडे निघाले आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाल्यानंतरीही मजुरांची पायपीट सुरुच आहे.
मनमाडमार्गे रोज अनेक कामगार मध्य प्रदेश, राजस्थान कडे पायी जात आहेत. मनमाड शहरातील गुरुद्वारा मार्फत रोज पायी जाणाऱ्या मजुरांना जेवण दिले जात आहे. सरकारने सर्वांना आहे, तिथेच थांबण्याची सूचना केली आहे. मजुरांची जेवणाची व्यवस्था करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आल्यामुळे मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली आहे.