नाशिक - कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे तेवढ्याच भागात पाऊस पडत असतो. त्यामुळे त्यासमोरील भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ शकते. तसेच अशास्त्रीय पद्धतीने हा प्रयोग करण्यात येतो. त्यामुळे शासनाने हा प्रयोग करून पैसे वाया घालवू नये, असे मत हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केले.
ढगांवर फवारणी करण्यात येणारे रसायन प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात फवारल्यास ढग नष्ट होतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या पडणारा पाऊसदेखील पडत नाही. कृत्रिम पावसाच्या प्रयोगात वापरले जाणारे 'सिल्वर आयोडाइड' हे विषारी रसायन आहे. हे रसायन पर्यावरण आणि सस्तन प्राण्यांसाठी घातक आहे. पावसाबरोबर जमिनीतील मातीत घातक रसायन मिसळल्यामुळे पिकांचे नुकसान होत असते. सिल्वर आयोडाइड मुळे पर्यावरणालादेखील हानी पोहोचत असल्याचे जोहरे म्हणाले.