नाशिक -कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला 'अघोषित कांदा खरेदी बंद'चा विषय आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. आज दुपारी 2 वाजता कांदा व्यापाऱ्यांची मुंबईत बैठक होणार आहे. या वेळी, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याची भूमिका आज निश्चित होणार आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे साठा मर्यादा रद्द करण्याची मागणी करावी, या मागणीवर व्यापारी ठाम आहेत. काल शरद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती.
हेही वाचा -केंद्र सरकारशी बोलून दोन दिवसात कांद्याचा तिढा सोडवणार, शरद पवारांचे आश्वासन
कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तीकर विभागाचा छापा..
केंद्र शासनाने कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यात बंदीची घोषणा केली आहे. तरीही कांद्याचे दर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने बुधवारी प्राप्तीकर विभागाने लासलगाव नऊ व पिंपळगाव येथील एका कांदा व्यापाऱ्यांच्या आस्थापनांवर छापा टाकला. यात कांदा खरेदी-विक्रीच्या पावत्या, कांदा विक्रीची बिले व कांदा साठवणुकीबाबत चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. लासलगाव बाजार समितीमध्ये याचा परिणाम दिसून आला. यानंतर व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने एकही कांदा व्यापारी लिलावासाठी तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतकऱ्यांकडे कांदा तसाच पडून राहिल्याने त्यांचीही अडचण झाली आहे.
शरद पवार यांची भूमिका..
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. कांद्याच्या दरात कायम चढ उतार होणे ही चिंतेची बाब असून कांदा आयात-निर्यातीचे सर्व अधिकार केंद्राकडे असल्याचे पवार म्हणाले. यात राज्य सरकारकडे फारसे अधिकार नसल्याने त्यांच्याकडून फार अपेक्षा करता येणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याचे आपल्याला माहीत आहे. यावर एकत्र बसून सोडवण्याची आपली भूमिका आहे. व्यापार व्यवस्थित सुरू राहिलाच पाहिजे, असे पवार यांनी म्हटले होते. तसेच, शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूंनी नुकसान होऊ देऊ नये, अशी आग्रहाची विनंती बैठकीत व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना केल्याचेही पवार यांनी ट्विट करून सांगितले होते.
हेही वाचा -शरद पवार नाशिक दौऱ्यावर; कांदा प्रश्नावर शेतकरी-व्यापाऱ्यांशी साधणार संवाद