नाशिक -मागील २ ते ३ दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरातील पाणीकपात रद्द होण्याचा अंदाज असताना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मात्र, पाणीकपात रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. धरण क्षेत्रात अजून समाधानकारक पाऊस होईपर्यंत पाणी कपात रद्द करणार नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली. याच पाणी कपात मुद्द्यावर आज महासभेत देखील गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
पाणीकपात रद्द करण्याचा प्रस्ताव महापौरांनी फेटाळला, नगरसेवकांचा सभात्याग - नाशिक
नाशिममध्ये मुसळधार पावसानंतर शहरातील पाणीकपात रद्द होईल, असा अंदाज नागरिकांना होता. मात्र, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पाणीकपात रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
स्थायी समिती सदस्य निवड मुद्यावर आज महासभेचे आयोजन करण्यात आले होते. याच महासभेत पाणीकपात संदर्भात राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आणि गुरमीत बग्गा यांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, महापौरांनी हा प्रस्ताव न घेताच स्थायी समिती निवड प्रक्रिया सुरू केली. प्रस्ताव घेण्यात आला नाही म्हणून शेलार आणि बग्गा यांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केला. भाजप पक्षाला आणि महापौरांना नाशिककरांचे काहीच घेणे देणे नाही त्यामुळे पाणी या विषयावर प्रस्ताव असतानादेखील प्रस्ताव महासभेत वाचण्यात आला नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला. सध्याच्या घडीला गंगापूर धरण ३४ टक्के आणि दारणा धरण जवळपास ४० टक्के भरला आहे. त्यामुळे शहरात पाणीकपात रद्द करा, अशी मागणी देखील नगरसेवकांनी केली
गेल्या दोन-तीन दिवसात नाशिक मध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिक मधील पाणीकपात रद्द होईल, असे वाटत असताना गंगापूर धरणात ९० टक्के पाणीसाठा होईपर्यंत पाणीकपात सुरूच राहील, अशी माहिती महापालिका आयुक्त गमे यांनी दिली. याच मुद्द्यावर आज महासभेत देखील गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या २ दिवसाच्या मुसळधार पावसानंतर गंगापूर धरण ३४ टक्के भरले असले तरी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पाणीकपात संदर्भात निर्णय घेऊ, अशी सावध भूमिका आयुक्तांनी घेतली. आजच्या महासभेत पाणीकपात प्रश्नावरून गोंधळ झाला असला तरी पाणी कपातीच्या संकटातून तूर्त तरी नाशिकरांना दिलासा मिळणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे किमान एक वेळ तरी पाणीपुरवठा सुरळीत करावा एवढीच अपेक्षा नाशिकरांना आहे.