नाशिक - आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपतींसोबत (Sambhaji Chhatrapati protest) नाशिक जिल्ह्यातील हजारो कुटुंब उपोषणाला बसणार असल्याची घोषणा सकल नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha Nashik) आज केली. 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाला सक्रिय पाठिंबा देऊन त्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो मराठा प्रमुख समन्वयक उपस्थित होते.
मराठा आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ठ झाल्यानंतर मराठा समाजाला न्याय मिळण्यास विलंब होत आहे. हे लक्षात घेऊन संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य आणि केंद्र सरकारला त्यांच्या हातातील मुद्दे सोडवून दिलासा देण्यासाठी प्रस्ताव दिला होता. केवळ प्रस्ताव देऊन ते शांत बसले नाहीत तर निवडक पाच-सहा मुद्दे काढून त्याची अंमलबजावणी सरकारने केली तरी मराठा समाजाचे बहुतांश प्रश्न मार्गी लागू शकतात, अशी यामागची संभाजीराजेंची प्रामाणिक भूमिका होती. राज्य शासनाने दिलेला प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर संभाजीराजेंसह क्रांती मोर्चासोबत बैठका झाल्या. आश्वासनं दिली गेली. घोषणाही झाल्या. संभाजीराजेंनी दिलेला प्रस्ताव किती व्यावहारिक आहे याचा अभ्यास करण्यासाठी भोसले समितीही स्थापन झाली. भोसले समितीनेही अभ्यास करून संभाजीराजेंच्या प्रस्तावाला व्यावहारिक म्हणून स्वीकारण्याची शिफारस राज्य सरकारला केली. तथापि राज्य सरकारकडून केवळ शाब्दिक आश्वासनापलीकडे कुठलीही ठोस अंमलबजावणी झाली नाही.
या आहेत मागण्या -
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पत वाढवून बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे, सारथीसारखी संस्था सक्षम करून त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी मराठा तरुण पात्र बनविणे, तसेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले आणि न्यायालयाने निर्देशीत केलेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ पूर्वलक्षी नियुक्त्या देणे, कोपर्डीच्या भगिनीला न्याय देण्यासाठी पूर्व निकालाला दिले गेलेले आव्हान खोडून काढण्यासाठी न्यायिक प्रक्रियेला वेग देणे अशा निवडक मुद्द्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्या संभाजीराजेंनी केली.