मनमाड (नाशिक) -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात केलेल्या लॉकडाऊनचा रेल्वे विभागातील काही अधिकाऱ्यांनी फज्जा उडवला असून, मनमाड जवळ रोज सुमारे 30 कर्मचारी कोणतेही सुरक्षेचे उपकरण न वापरता एकत्रितपणे काम करत आहेत. अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे जीव धोक्यात घालून कामगार काम करत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार; एकाचवेळी 30 कर्मचारी करतायेत एकत्रित काम एकीकडे देशाला कोरोनाचा विळख्यातून वाचवीण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करीत असून, देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. विमानसेवेपासून ते रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र रेल्वचे अधिकारीच लॉकडाऊनचा फज्जा उडवीत असल्याचा धक्कादायक प्रकार मनमाड जवळ रेल्वेच्या रापली गेटवर समोर आला आहे. या ठिकाणी सुमारे 25 ते 30 कर्मचारी एकत्रितपणे येऊन कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता रेल्वे रुळावर काम करीत असल्याचा व्हिडिओ हाती लागला आहे.
यामध्ये जवळपास सर्वच कर्मचारी एकत्रित काम करताना दिसत असून, त्यांच्याकडे ना काही उपाययोजना आहेतो ना सुरक्षित अंतर. यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रल्वे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
मनमाड पासून रेल्वेच्या किलोमीटर 54 पासून काही अंतरावर रापली गेटच्या रेल्वे रुळावर पीडब्ल्यूआय या विभागाचे सेक्शन इंजिनियर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काम केले जात आहे. लॉक डाऊनच्या काळात सर्व उद्योग धंदे बंद असून, एखाद्या दुकानात 3ते 4 नागरिक जरी दिसले तरी त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. येथे तर रेल्वेचा अधिकारी सर्व नियम मोडीत काढून मनमानी पद्धतीने काम करून 25 ते 30 कामगारांचा जीव तर धोक्यात घालत आहेत. शिवाय केंद्र शासनाच्या नियमांचे देखील उल्लंघन करीत असल्याने या अधिकाऱ्यावर रेल्वे विभागाकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.