नाशिक: जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात आदिवासी संघटनेचा मणिपूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. अशात काही मोर्चेकरांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करत 20 ते 25 वाहनांच्या काचा फोडल्या. घटना स्थळी पोलीस दाखल होतच जमावाने पोलिसांवर ही दगडफेक केली. यात काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. सद्यस्थितीत सटाणा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, काही संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मोर्चाला हिंसक वळण :मणिपूर हिंसाचारात महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलन करण्यात येत आहेत. तर नाशिकच्या सटाण्यात मणिपूर अत्याचाराच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. सटाण्यातील नागरिकांनी महामार्ग रोखत वाहनावर दगडफेक केली.
पुण्यात मणिपूर घटनेचा निषेध :मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची नग्न धिंड काढून त्यांना मारण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आक्रमक महिला शिवसैनिकांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर येथील मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
काँग्रेसच्या महिला आमदार यांचा संतप्त : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र केल्याच्या घटनेनंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले आहेत. विधिमंडळात मणिपूर प्रकरणावर चर्चा करण्यासंदर्भात अध्यक्षांनी परवानगी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी काँग्रेसच्या महिला आमदारांचे रौद्ररूप पाहायला मिळाले. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड यांना सभागृहात बोलू न दिल्याने काँग्रेस आमदारांनी राज्य सरकारचा निषेध केला होता.