नाशिक -विवाह संकेतस्थळाच्या मदतीने ५० हुन अधिक घटस्फोटित महिलांशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करणारा भामटा नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पीडित महिलांनी एकत्र येत छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या हवाली केले आहे.
संपत दरवडे उर्फ मनोज पाटील व मयूर पाटील असे वेगवेगळी नावे सांगत विवाहाच्या संकेतस्थळावरून घटस्फोटित महिलांशी संपर्क साधायचा. त्यांचा विश्वास संपादन करून लग्नानंतर त्यांची आर्थिक फसवणूक करायचा. या भामट्याला नाशिक पोलिसांनी गजाआड केले आहे. हा तरुण शादी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम, अशा वेगवेगळ्या विवाह नोंदणी संकेतस्थळावर आपल्या खोट्या प्रोफाईल बनवून टाकत होता. घटस्फोटीत व मूल बाळ आहे अशा महिलांना तो आपल्या जाळ्यात ओढत होता. लग्न केल्यानंतर परिवारातील सदस्यांचा विश्वास संपादन करून पैसे व सोन्याची मागणी करून ते मिळाल्यावर तो पोबारा करत असे.
हेही वाचा - नाशिक : हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी विद्यार्थीनींच्या संमिश्र प्रतिक्रिया
मालवण येथील एक पीडित महिला नाशिकच्या छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आली आणि त्यांनी ह्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती दिली. ह्यावरून ह्या भामट्याला नाशिक गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने पकडण्याची योजना आखण्यात आली. ह्यावेळी फसवणूक झालेल्या वेगवेगळ्या शहरातील महिला एकत्र आल्या होत्या.