येवला (नाशिक) - तालुक्यात शनिवारी सायंकाळी व रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील अनकुटे, गुजरखेडे आणि विसापूर या गावातील अनेक शेतकऱ्यांचे मका पीक जमीनदोस्त झाले. मका पिकाची काढणी थोड्याच दिवसांवर आली असताना पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना परत एकदा संकटाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने सबंधित विभागाला आदेश देऊन मका पिकाचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गुजरखेडे येथील शेतकरी कैलास होन यांच्या शेतातील मका पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. जनावरांना चारा म्हणून देखील मका पिकाचा वापर करता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनकुटे गावातील चांगदेव गायकवाड यांच्या अडीच एकर शेतातील मका पीक पावसाने जमीनदोस्त झाले असून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.