नाशिक : राज्यातील दूध उत्पादकांच्या दुधाला योग्य दर मिळत नसल्याने तो संकटात सापडला असल्याची टीका करत दूध दरवाढीच्या मागणीसाठी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्या नेतृत्वात महायुतीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकार्यांना दुधाची पिशवी देऊन निषेध नोंदविण्यात आला. दुधाला योग्य दर न मिळाल्यास येत्या १ ऑगस्टपासून राज्यभर रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा मेटे यांनी दिला आहे.
नाशिक : दूध दरासंदर्भात महायुतीचे आंदोलन, जिल्हाधिकार्यांना दुधाची पिशवी देऊन नोंदवला निषेध - dairy farmers agitation nashik news
राज्यभरात दूध दरवाढ मागणीचा मुद्द्याने पेट घेतला असून दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. नाशिकमध्ये दूध दरवाढीच्या मागणीसाठी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्या नेतृत्वात महायुतीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केले. सोबतच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दूध उत्पादकांना कोणतीच संस्था २५ रुपये भाव देत नाही. सरकारकडून दुध उत्पादक शेतकर्यांची पिळवणूक सुरू आहे. त्यामुळे, राज्य शासनाने दुधाला दहा रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे. तर दुध भुकटीला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे. हे दोन्ही निर्णय या महिन्यात घेतले जावे. अन्यथा १ ऑगस्टपासून राज्यातील प्रत्येक जिल्हा व जिल्ह्यातील गावगावात दूध दर आंदोलन केले जाईल. रस्त्यावर उतरुन उग्र आंदोलन केले जाईल व त्यास राज्यातील ठाकरे सरकार जबाबदार राहिल असा इशारा मेटे यांनी दिला.
या बाबत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार प्रा. देवयानी फरांदे, भाजप शहराध्यक्ष गिरिश पालवे, रिपाइचे प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.