नाशिक - अडीच वर्षांपूर्वी नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीनंतर कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे पहिल्यांदा स्थानिक पातळीवर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. याही निवडणुकीत भाजपला दूर ठेवण्यासाठी तीनही पक्ष एकत्र येणार हे निश्चित असले तरी अध्यक्ष पदावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
हेही वाचा - समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न झारखंडच्या जनतेने नाकारला - शरद पवार
एकेकाळी संपूर्ण राज्यात भाजपचा बोलबाला सुरू होता. मात्र, भाजपला स्थानिक राजकारणात देखील ग्रहण लागल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळे समीकरणे बदलली आहेत. नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची धुरा ही शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला जिल्हा परिषदेपासून दूर राहावे लागणार असल्याचे चित्र जाणवत आहे.
काँग्रेसच्या विद्यमान उपाध्यक्षा नयना गावित आणि अपक्ष शंकर धनवटे हे शिवसेनेकडे आले आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ 43 झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या शीतल सांगळे या अध्यक्ष आहेत. यावेळी मात्र अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दावा करू शकते.