नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर 10 ते 14 मार्चपर्यंत बंद ठरवण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त देशभरातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला महादेव मंदिरात येत असतात मात्र गेल्या आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, असे असले तरी मंदिराला आकर्षक म्युझिकल विद्युत रोषणाई करण्यात आल्याने मंदिर उजळून निघाले आहे.
त्र्यंबकेश्वर शहरात 144 कलम लागू -
महाशिवरात्रीच्या दिवशी निघणारी पालखी ही कोठेही न थांबता थेट शिवमंदिरात म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिरात जाईल आणि विधिवत पूजाअर्चना केली जाईल, असाही निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन प्रशासन अधिकाऱ्यांनी केले आहे. महाशिवरात्रीला त्र्यंबकराजांची मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा केली जाईल. दरवर्षी हजारो भाविक महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकेराज्याच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे यंदा ही गर्दी होऊ नये, कोरोनाचे सर्व नियम पाळले जावेत, त्याकरिता पोलीस प्रशासनाने देखील 10 ते 14 मार्च दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरात 144 कलम लागू करून जमावबंदीचे आदेश दिले आहेत.