नाशिक -कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नाशकात करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यानी सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. मात्र नाशिक तिसऱ्या टप्यात असल्याने दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय वीकेंड लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची रोज कमी होणारी संख्या तसेच ऑक्सिजन बेडवरील रुग्णसंख्येत झालेली घट पाहून अनलॉकसाठी राज्य शासनाने लावलेल्या पाच टप्प्यातील आणि करारानुसार जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यानुसार सध्या लागू निर्बंधात आता आणखीन शिथिलता देण्यात आली आहे. अत्यावश्यक सह सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आजपासून सर्व दुकान, हॉटेल, सलून, ब्युटीपार्लरची सकाळी 7 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह बंद ठेवण्यात आले आहे.
काही भागात नागरिकांची मोठी गर्दी
तब्बल दोन महिन्यानंतर सर्व दुकाने उघडल्याने आज पहिल्याच दिवशी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. नाशिकच्या आरके, एमजीरोड, मेनरोड, रविवार कारंजा, पंचवटी आदी बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
अशी आहे नाशिकसाठी नियमावली
- सर्व दुकाने व आस्थापना ( सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू)
- उपहारगृह 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यानंतर फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरी
- सार्वजनिक ठिकाणे, पटांगण वॉकिंग, सायकलिग रोज सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत
- खाजगी कार्यालय दुपारी 4 वाजेपर्यंत खुली राहतील.
- शासकीय व खाजगी कार्यालय पन्नास टक्के उपस्थिती.
- लग्नासाठी 50 लोकांची परवानगी
- अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना परवानगी
- बांधकाम ठिकाणी राहणाऱ्या मजुरांना दुपारी 4 वाजेपर्यंत कामाची मुभा.
- जिम, सलून, ब्युटी पार्लर 50% क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी.
- सार्वजनिक वाहतूक शंभर टक्के सुरू, उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही सर्व प्रकारची मालवाहतूक सुरू
हेही वाचा -'जातीपातीचा भेद दूर न झाल्यास देशाच्या सार्वभौमत्वाला धोका'