नाशिक :राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणारे आज पवारांसोबत आहेत. नाशिकची जनता माझ्याबरोबर आहे. शिस्तभंग झालेल्या नेत्यांनी काल राष्ट्रवादीच्या सभेची तयारी केली. २००३ मध्ये तेलगी प्रकरणात मला लक्ष्य केले. तेव्हा सीबीआयच्या आरोपपत्रात नाव नव्हते, असे म्हणत भविष्यात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत आहेत.
'जे झाले, ते घरातूनच झाले' : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, मला शरद पवारांनी येवल्यात पाठविले नाही. मी येवल्याची निवड केली. मी ओबीसीचा नेता असल्याने शरद पवार येथे आले आहेत. तुम्ही किती ठिकाणी माफी मागणार? राज्यभरात माफी मागणार का? असा खोचक सवाल भुजबळ यांनी केला आहे. येवल्याचा 20 वर्षे विकास केला आहे. बारामतीनंतर येवल्याचाच विकास झाल्याचे पवार यांनी म्हटले होते. जे झाले, ते घरातूनच झाले. निकटवर्तीय का सोडून गेले, याचा विचार पवारांनी करावा, असा टोलाही भुजबळांनी लगावला.
'राजीनामा देणार हे माहित होते' :मोदी व शाह यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांना पाठवायचे. ते सुद्धा गेले आहेत. छगन भुजबळ यांनी हे सर्व घडवून आणले, हा पवार साहेबांचा चुकीचा समज आहे. 2014 व 2017 मध्ये सेनेला भाजपपासून दूर करण्याचे शरद पवारांचे प्रयत्न होते. शरद पवार यांनी पुस्तक समारंभात राजीनामा देण्याचे पंधरा दिवसापूर्वी ठरले होते. हे मला माहित होते. त्यावेळी मी घरातील वाद दूर करण्यास सांगितले होते, असेही भुजबळ यांनी सांगितले.