नाशिक :वर्षभरापूर्वी शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली. यावरुन राज्यात राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली चिखलफेक पाहून सामान्य मतदार संभ्रमात पडले आहेत. शिवसेना ठाकरे गट तसेच मनसे एकत्र येण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही एकत्र येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
दोघांनी एकत्र यावे : मुंबईतही साहेब आता एकत्र या असे, फलक लागले आहेत. नाशिकमध्येही या आशयाचे फलक झळकले आहेत. 'महाराष्ट्राला तुमची गरज आहे. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच ती वेळ आहे. आम्हाला महाराष्ट्रात फक्त आणि फक्त ठाकरे पाहिजेत' अशी आर्त साद या फकलाद्वारे घालण्यात आली आहे. हे फलक लक्षवेधी ठरत असून येणार्या काळात हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे.
'मी' कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता, नेता नाही. सामान्य मराठी माणूस आहे. राज साहेब ठाकरे यांच्या पक्षाने आत्तापर्यंत कुढल्याही पक्षाशी युती केली नाही. पण आता करावी, मी एक मराठी माणूस असून दोघांनीही एकत्र येऊन महाराष्ट्रचा विकास केला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. या दोघा नेत्यांनी सकारात्मक विचार केला तर सामान्य लोकांची अपेक्षा पूर्ण होईल. -कैलास निवृत्ती गांगुर्डे