नाशिक -मालेगाव मधील परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यातील उत्तम डॉक्टरांची टास्क फोर्स टीम तयार केली जाणार आहे. या शिवाय ज्या भागातील नागरिक वैद्यकीय यंत्रणा आणि पोलिसांना सहकार्य करणार नाहीत, अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबधीत अधिकाऱ्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यासह मालेगावमधील कोरोना परिस्तितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहे.नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे यांसह विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थीत होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनाचे रुग्ण आटोक्यात येत असताना विविध आजारांनी मृत्यू झालेल्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे नाशिक येथे 200 खाटांचे शासकिय रुग्णालय हे कोरोना नसलेल्या इतर रुग्णांसाठी राखीव करण्यात आले आहे. या ठिकाणी काम करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, असे शंभर जणांचे पथक तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी काहीजण आपल्या कर्तव्यावर अजूनही उपस्थित नाहीत. त्यांना हजर राहण्यसाठी 24 तासांची वेळ दिली आहे. कामावेळी पीपीई किट देण्यात येईल कामांच्या वेळाही त्यांच्या पद्धतीने ठरविण्यात येतील. पण, जर दिलेल्या वेळे जे हजर राहणार नाहीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.