नाशिक - मी कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणार नाही, प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या या वाक्यामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. एकीकडे सरकार नागरिकांना कोरोना लस घ्यावी, असे सांगत असतांना दुसरीकडे इंदुरीकर महाराज लसचा काय उपयोग? असा प्रचार करत आहेत. हे चुकीचे आहे. इंदुरीकर महाराज हे डॉक्टर नाही, त्यांनी फक्त धर्म प्रचारकाचे काम करावे. आरोग्य विभागाला त्यांचे काम करू द्यावे, असे मत महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाची लस घेणे हा या महामारीवर सध्या एकमेव उपाय आहे. आतापर्यंत भारतात 100 कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, अद्यापही काही जण आहेत ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही. याच लोकांमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा समावेश आहे. आपल्या किर्तनामुळे नेहमी चर्चेत राहणारे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
इंदुरीकर महाराज डॉक्टर नाही -
इंदुरीकर महाराज मोठे कीर्तनकार आहे. त्यांना मोठा वर्ग फॉलो करणारा आहे. अशा संत अभ्यासकाने असे वक्तव्य करू नये. आज जागतिक आरोग्य संघटनेत असलेल्या आरोग्य क्षेत्रातील विद्वानांनी कोरोना लसची तपासणी करून मान्यता दिली आहे. ती सर्वानी स्विकारायला पाहिजे. कारण इंदुरीकर महाराज हे डॉक्टर नाहीत किंवा डॉक्टरांच्यावर नाहीत. ते फक्त धर्म, संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी त्याच्या त्या कामात पुढे जावे. प्रगती करावी. मात्र, जर इतर क्षेत्रातील गोष्टीविषय महाराज बोलतात. त्यामुळे इतर धर्म क्षेत्रातील व्यक्तींकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन चुकीचा होईल, असे मत महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी व्यक्त केले आहे.