सटाणा(नाशिक) - विवाहसोहळा म्हटला की अंगणात मांडव व पाहुण्यांची वर्दळ हमखास पहायला मिळते. याच मांडवात आप्तेष्टांच्या साक्षीने मोठ्या थाटात नववधू-वराच्या आयुष्याच्या रेशीमगाठी जुळतात. मात्र, ऐन लगिनसराईच्या मोसमात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने अनेक विवाहेच्छुकांचे विवाह रखडले आहेत. तर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही जणांचे ठरलेले विवाहसोहळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहेत. अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत अनेकजण साध्या पध्दतीने आटोपशीरपणे लग्न उरकून घेत आहेत.
LOCKDOWN : सटाण्यात पारंपरिक थाटमाटास फाटा देत पार पडला अनोखा विवाह सोहळा
लग्नात वरात, बँडबाजा, पै पाहुणे, मानपान, जेवणावळी असला पारंपरिक कुठलाच थाटमाट न करता हा विवाह सोहळा पार पडला. वधू-वर, भटजी आणि प्रशासनाच्या नियमाप्रमाणे मोजक्या जणांच्या उपस्थितीत हे शुभमंगल संपन्न झाले.
जायखेडा ता. बागलाण येथील शांताराम पंडीत जाधव यांची कन्या मयुरी व नवी बेज ता. कळवण येथील दशरथ पांडुरंग बच्छाव यांचे चिरंजीव प्रतीक यांचा शुभ विवाह मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साधेपणाने संपन्न झाला. लग्नात वरात, बँडबाजा, पै पाहुणे, मानपान, जेवणावळी असला पारंपरिक कुठलाच थाटमाट न करता हा विवाह सोहळा पार पडला. वधू-वर, भटजी आणि प्रशासनाच्या नियमाप्रमाणे मोजक्या जणांच्या उपस्थितीत हे शुभमंगल संपन्न झाले. फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत सर्वांनी आपल्या हातावर सेनिटायटझर व तोंडाला मास्क लावून नियमांचे काळजीपूर्वक पालन करीत लग्नात हजेरी लावली.
ठरलेल्या मुहूर्तावर पुरोहितासह नववधू, नवरदेव व दोन्ही बाजूंचे अगदी आठ ते दहा वऱ्हाडी मंडळी घरात एकत्र आले होते. कोरोनाच्या काळात लॉकडाउनचे सर्व नियम पाळत वधूवरांनी आपआपल्या तोंडावर मास्क बांधूनच अंतर ठेवत एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा टाकल्या. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जायखेडचे सरपंच शांताराम अहिरे आदींनी नवविवाहिताना शुभेच्छा दिल्या. जाधव व बच्छाव परिवाराने विवाहचे निमंत्रण सोशल मिडियावर आपल्या हितचिंतकांना पाठवले खरे; मात्र या निमंत्रणात ‘आपल्या घरीच रहा, व उभयतांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा द्या’, व स्वतःची काळजी घ्या, असे आवर्जून त्यांनी नमूद केले होते. दोन्ही कुटुंबीयांनी या कठीण काळात आतिशय साध्या पद्धतीने लग्न करीत हौसमौजपेक्षा सामाजिक भान व देशाची स्थिती खूप महत्त्वाची असते, हेच दाखवून समाजापुढे आदर्श निर्माण केला.