नाशिक -शहरात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणी पाहणी करून, नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन अटळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
.... तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील विविध भागातील गर्दीच्या ठिकाणी पाहणी केली, सिडको परिसरातील राणा प्रताप चौकातून पाहाणीला सुरुवात झाली. उत्तम नगर, पवन नगर, त्रिमूर्ती चौक, शालिमार, गाडगे महाराज पुतळा या परिसरात जाऊन त्यांनी पाहाणी केली. यावेळी छगन भुजबळ यांनी नागरिक, दुकानदार, हॉटेल चालक, रिक्षाचालक यांच्याशी संवाद साधत मास्क वापरण्यासोबत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून, पालन न केल्यास लॉकडाऊन शिवाय पर्याय शिल्लक राहणार नसल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.