नाशिक - कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे अनेकांसमोर उदरर्निवाहाचा प्रश्न उभा ठाकला. अनेक ठिकाणी ऑटो चालकांनी ऑटो चालविणे बंद करून पंक्चरचे दुकान लावले. तर शहरातून बेरोजगार होऊन आलेल्या तरुणांनी कुठे चहाचे तर, कुठे नाश्त्याचे दुकान थाटले. अशाच एका फोटोग्राफरचा व्यवसाय बंद झाल्याने तो शेतीकडे वळला आणि त्याने यांत्रिक पद्धतीने कांदा लागवड केली. येवला तालुक्यातील एरंडगाव येथील तुकाराम मढवई असे या फोटोग्राफरचे नाव आहे.
टाळेबंदीचा फटका...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. अनेक सण-समारंभ पुढे ढकलण्यात आले. लवकर परिस्थितीत सुधारणा होईल, असे अनेकांना वाटत होते. मात्र त्यांच्या आशेवर पाणी फिरले. उन्हाळ्यात लग्नांचा धुमधडाका असतो. यामध्ये फोटोग्राफरचा चांगला व्यवसाय होत असतो. टाळेबंदीमुळे यंदा लग्नसराई होऊ शकली नाही. शिवाय नंतरच्या काळात काही बंधने टाकून लग्नाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे अनेकांनी कोणताही खर्च न करता मोजक्या पद्धतीने कार्यक्रम पार पडले. त्यामुळे या काळातही फोटोग्राफरचा व्यवसाय ठप्पच राहिला. तुकाराम मढवई यांचा देखील व्यवसाय बंद असल्याने, पुढे काय करायचा हा प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी शेती व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला.