नाशिक - दारू विक्रीवरून असलेला गोंधळ काही केल्या कमी होताना दिसत नाही. एकीकडे सरकार दारू घरपोच द्यावी, असा अट्टाहास करत असले तरी दुसरीकडे याच निर्णयाला दारू विक्रेत्यांनी विरोध दर्शवला आहे. कोरोना संक्रमणाची भीती व्यक्त करत दारू विक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशाला धुडकावून लावत सर्रासपणे सामान्य दारू विक्री सुरूच ठेवल्याने मद्यपींमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.
४ मे रोजी दारूची दुकाने सुरू होणार म्हणून पहिल्याच दिवशी प्रत्येक दारू दुकानाबाहेर गोंधळ झाला. हा गोंधळ पाहून जिल्हा प्रशासनाने दारू विक्रीचा निर्णय तत्काळ रद्द केला. मात्र, पुन्हा चार दिवसांनी दारू विक्रीला सुरुवात झाली. पुन्हा तेच घडले, पोलीस बंदोबस्तात दारूविक्री सुरू झाली. मात्र, पहिल्या दिवशी जे घडले तेच पुन्हा घडले. कोरोनाच्या संक्रमणाची भीती पुन्हा सुरू झाली आणि दारूची 'होम डिलीव्हरी' करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यावर दारू विक्रेत्यांनी आरोग्य सुरक्षासह अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत विरोध दर्शवला.