नाशिक - गेल्या चार दिवसांपासून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह सुरगाणा तालुक्यात संतधार सुरू आहे. पावसामुळे गाव पाड्यांना जोडणारे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. सुरगाणा तालुक्यातील झगडपाडा येथील अरुंद पुलावरुन पाणी वाहत आहे. शालेय विद्यार्थी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून या पुलाचा जाण्या-येण्यासाठी उपयोग करत आहेत.
नाशकात संततधार; सुरगाणा तालुक्यात विद्यार्थ्यांचा वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास.. - Life-threatening journey of students
पावसामुळे गाव पांड्याना जोडणारे अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. सुरगाणा तालुक्यातील झगडपाडा येथील अरुंद पुलावरुन पाणी वाहत असुन, शालेय विद्यार्थी, कर्मचारी व स्थानिक नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
शासकीय आश्रमशाळा ते झगडपाडा मध्ये अरुंद आणि कमी उंचीचा पूल आहे. थोडा पाऊस पडला तरी येथे पुर येत असल्याने या परिसरातील झगडपाडा, खोकरविहिर, चिंचपाडा, भेनशेत, कहांडोळपाडा या गावातील विद्यार्थ्यांना,नागरिकांना तसेच शाळेतील शिक्षकांना या पुलावरून येताना-जाताना जीव धोक्यात घालून कसरत करावी लागते आहे. जास्त पाऊस पडला तर पुरस्थितीमुळे शाळेच्या शिक्षकांना शाळेवर पोहोचता येत नाही. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना व आय.टी.आय च्या विद्यार्थ्यांनाही वेळेवर जाता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे.
सुरगाणा तालुक्यातील अशा छोट्या पुलावरून यावर्षी दोन शिक्षक पुरातून मार्ग काढताना वाहून गेले. यात त्यांना जीव गमवावा लागला होता. गेल्या अनेक वर्षांपासुन नागरीकांना हा त्रास सहन करावा लागतोय. दुर्घटना होवु नये म्हणुन जास्त उंचीचा पूल बनविण्याची मागणी तालुक्यातील नागरीकांनी केली आहे. एकीकडे सरकारकडून सर्व शिक्षा अभियानाचे ढोल बडवले जातात, आणि महाराष्ट्र शिक्षणात प्रगत असल्याचे सांगितले जाते. पण याच प्रगत राज्याच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याच चित्र सुरगाणा तालुक्यात बघायला मिळत आहे.