नाशिक: बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. याआधीही भरवस्तीत बिबट्या किंवा रानटी प्राणी घुसून ग्रामस्थांना त्रास देण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अशात या बिबट्यांना कुठल्या प्रकारची इजा न करता त्यांना रेस्क्यू करून त्यांच्या अधिवासात पाठवण्याचे काम वन विभाग करते. याच वन विभागात काम करणारे अधिकारी म्हणून सुनील वाडेकर यांची ओळख आहे. वाडेकर यांनी 20 वर्षाच्या सेवेत मानवी वस्तीत आलेल्या 150 हुन अधिक बिबट्यांना सुरक्षित रेस्क्यू करून त्यांच्या अधिवासात सोडले आहे. त्यामुळे ते लेपर्ड मॅन म्हणून सर्वत्र परिचित आहे.
लेपर्ड मॅन म्हणून परिचित: नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबद, ठाणे, पुणे, नांदेड, सातारा, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यात मानवी वस्तीत शिरलेल्या सुमारे दीडशेहून अधिक बिबट्यांना रेस्क्यू करून प्राण वाचवले आहे. म्हणून ते सर्वत्र त्यांना लेपर्ड मॅन म्हणून परिचित आहे. 24 वर्षांपूर्वी वन्यजीवांसाठी काम करण्याच्या तळमळीने त्यांनी रेल्वेमधील नोकरी सोडून, वनविभागात प्रवेश मिळविला. मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांवर मात करणे यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. जीवाची बाजी लावून बिबट्या बचावाचे काम ते आजही करत आहे.
हॉटेलमध्ये बिबट्या: 2004 मध्ये शहरात प्रथमच बिबट्या शिरल्याचा प्रसंग घडला. त्यापूर्वी शहराच्या भरवस्तीत बिबट्या शिरल्याची घटना कधीही घडली नव्हती. मुंबई नाका परिसरातील रसोई हॉटेलमध्ये बिबट्या लपल्याची माहिती वाडेकर यांना मिळाली. मात्र त्यावेळी नाशिकमध्ये बिबट्याला बेशुद्ध करण्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती. म्हणून मुंबईहून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. त्या पथकाला नाशिकमध्ये दाखल होण्यास पाच तास लागणार होते. मात्र तो पर्यंत बिबट्याने धुमाकूळ घालत चार ते पाच जणांना जखमी केले होते. हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिबट्याला बंदुकीच्या गोळीने ठार करण्याचे आदेश दिले.