नाशिक - मनमाड-चांदवड परिसरात वाहन चालकांना बिबट्याच्या शिकारीचा थरार अनुभवायला मिळाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रात्रीच्या वेळी शिकारीला बाहेर पडलेला बिबट्या एका चारचाकीसमोर आला. यानंतर चालकाने त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.
नाशिक: बिबट्याच्या जबड्यातूून ससा फरार... शिकारीचा व्हिडिओ पाहाच! बिबट्याला अचानक समोर ससा दिसला. त्याला पाहून बिबट्याने दबा धरत ससा जवळ येताच त्याच्यावर झडप घालून जबड्यात पकडले. मात्र काही क्षणातच बिबट्याच्या जबड्यातून ससा निसटला आणि त्याने जंगलात धूम ठोकली. हा थरार रात्री मनमाडजवळ चांदवड रस्त्यावर पाहायला मिळाला.
उपस्थितांनी हा थरार मोबाइलमध्ये कैद केला. काल रात्री याच भागात बिबट्याची मादी आढळली होती. आता दुसरा बिबट्या देखील फिरत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन्ही बिबट्यांना वन विभागाने पिंजरा लावून पकडण्याची मागणी केली आहे.
निफाड, सिन्नर, इगतपुरी बिबट्याचे 'हॉटस्पॉट'
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट आहेत. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या देखील आहेत. त्यामुळे या तालुक्यांमध्ये उसाचे मोठे क्षेत्र आहे.
बिबट्यांना लपण्यासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने या ठिकाणी त्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. या सोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. वनविभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात जवळपास 200 हून अधिक बिबटे असल्याचे समोर आले आहे. अनेकदा काही बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून आले आहे.