नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बीबट्या मुंबई महामार्गावर रस्ता ओलांडत असताना वाहनाने धडक दिली तेव्हा उघडकीस आली आहे. हा बीबट्या 6 वर्षाचा होता.
इगतपुरी, दिंडोरी निफाड सिन्नर या तालुक्यात सातत्याने बिबट्यांचा वावर
मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. विशेष करून नाशिकच्या इगतपुरी, दिंडोरी निफाड सिन्नर या तालुक्यात सातत्याने बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. यातील काही बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे, तर अजूनही काही बिबट्यांचा नागरीवस्तीत मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये अजूनही बिबट्याची दहशत आहे.
जास्त मार लागल्याने उपचार सुरु करण्याआधिच बिबट्या मृत
गुरुवारी रात्री सर्वसाधारण साडेअकरा वाजेच्या सुमारास मौजे नाशिक शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी गावच्या अलीकडे आणि नाशिक शहराच्या पुढे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच तातडीने नाशिक वन विभागाच्या पथक पोहोचले आणि बिबट्याला रेस्क्यू केले. तातडीने रोपवाटिकेत दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. मात्र, तोंडाला जास्त मार लागल्याने उपचार सुरु करण्यापुर्वीच बिबट्याचा मृत झाला आहे अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे आहे बिबट्याचे हॉट स्पॉट
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येतील. या तालुक्यांमधून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत आहेत. नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याच्या वावर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबतच मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वनविभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात जवळपास 200 हून अधिक बिबटे असल्याचे समोर आले आहे. अनेकदा काही बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचेही दिसून आले आहे.
हेही वाचा -शाहरुख खानचा मुलगा अबराम चाहत्यांना करतोय अभिवादन, व्हिडिओ होतोय व्हायरल