नाशिक :नाशिकरोड परिसरात बिबट्याच्या संचारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आनंदनगर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असून पायी चालणाऱ्या एका व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राजू शेख नावाच्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेख यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उंच उडी घेत बिबट्याचा हल्ला: सीसीटीव्हीच्या व्हिडिओमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची घटना कैद झाली आहे. आनंदनगर येथील कदम लॉन्स परिसरातून राजू शेख हे पायी जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावेळी त्यांच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. बिबट्याने झेप घेत शेख यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने हल्ला केल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी आरडाओरडा केला. लोकांच्या आवाजाने बिबट्या तेथून पळून गेला. परंतु राजू शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. राजू शेख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती वनविभागाला कळताच वनविभाग अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद: या भागातील गुलमोहर कॉलनीतील एका बंगल्यात बिबट्या शिरला असल्याचा कयास असल्याने या बंगल्याजवळ मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक जमा झाले होते. परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जय भवानी रोडवरील अडकेनगर 2 मध्ये पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. बिबट्याचा मुक्त संचार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. आर्टिलरी सेंटर रोडवरील गुलमोहर कॉलनीत रविवारी पहाटे बिबट्याने एक श्वानावर हल्ला केलाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तर काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यातून एक महिला बचावली होती.