नाशिक -नाशिकरोड येथील चेहेडी परिसरात सातपुते याच्या शेतात शनिवारी (दि. 4 जुलै) रात्री सातच्या सुमारास बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला केला आहे. बिबट्याने हल्ला करताच सुदैवाने आजोबांनी प्रसंगावधान राखत बिबट्याला वीट फेकून मारल्याने बिबट्या दूर पळाला अन् चिमुकल्याचा जीव वाचला आहे. जखमी मुलास बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुलाची प्रकृती स्थिर आहे.
जाखोरी येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्या जेरबंद केला असला तरी इतर अनेक बिबटे दारणाकाठच्या गावांमध्ये आढळून येत आहे. बिबट्यांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिक दहशतीत जगत आहेत. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास सातपुते मळ्यात बिबट्याने आयुष जयंत सातपुते (वय 8 वर्षे) हा आजोबा नेताजी काशिनाथ सातपूते यांच्यासह घरातून शेजारच्या घरात जात होता. यावेळी अचानक बिबट्याने हल्ला केला. हे पहाताच आजोबा नेताजी यांनी प्रसंगावधान राखत जवळच पडलेली वीट उचलून बिबट्याला फेकून मारली. बिबट्याचा हल्ला परतावून लावला. यामुळे आयुषचा जीव वाचला. नगरसेवक पंडीत आवारे यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.