नाशिक - कोरोनाच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यासह शहरातदेखील अनेक व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. असे असतानाच, आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या लासलगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीतील व्यवहारही आज(सोमवार) बंद करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. खबरदारीचा पर्याय म्हणून प्रशासनाने राज्यात कलम १४४ (जमावबंदी) लागू केली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करत लासलगाव बाजारपेठेत आज कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले. दरम्यान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सरकारी आदेश येईपर्यंत लिलाव बंद राहणार असल्याची माहिती समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. मात्र, अत्यावश्यक सेवा बघता बाजार समिती सुरू ठेवता येईल का, याबाबत समिती प्रशासन सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.