नाशिक Lalit Patil Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलने ड्रग्जच्या पैशांतून सोने, प्लॉट, फ्लॅट, महागड्या गाड्या अशा प्रकारची मालमत्ता जमविली होती. (Lalit Patil property) त्याला अटक केल्यावर पुणे पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या 50 लाखांच्या चार गाड्या जप्त केल्या. तसेच नाशिकला असलेले त्याचे प्लॉट, फ्लॅटची तपासणी करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक दोन दिवसांपासून नाशिक रोड विभागीय कार्यालयात तळ ठोकून आहे.
मालमत्तेचा तपशील मागितला:ललित पाटीलच्या संपत्तीच्या नोंदणीचे रेकॉर्ड तपासले जात आहेत. त्याच्या स्वतःच्या नावे तसेच कुटुंब सदस्य, प्रेयसीच्या नावे नाशिक शहर व जिल्ह्यात खरेदी केलेल्या मालमत्तेची माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी मुद्रांक व नोंदणी निरीक्षकांशी पत्रव्यवहार करून ललितच्या नावे असलेल्या मालमत्तेचा तपशील मागितलाय. त्याचप्रमाणे नाशिक येथे ललितचे निवासस्थान असलेल्या उपनगर व शिंदे पळसे भागात त्याच्या तसेच भाऊ कुटुंबाची मालकी असलेल्या मालमत्तेचा शोध घेतला जात आहे. पुणे पथकानं नाशिक रोड दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नोंदणीचे रेकॉर्ड तपासले असून त्यांना पाटील कुटुंब यांचे गाळे, भूखंड, फ्लॅट असल्याची कागदपत्रे हाती लागल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.