मनमाड(नाशिक) - मनमाड येथून जवळच असलेल्या कुंदलगाव येथील काका पुतण्याने पारंपरिक शेतीला फाटा देत अवघ्या पंधरा गुंठ्यात वांगीची शेती करत जवळपास एक लाखाच्यावर उत्पादन घेतले आहे. अजूनही ५० हजार पेक्षा जास्त उत्पन्न येण्याची त्यांना अपेक्षा आहे. कुंदलगाव येथील शेतकरी कुटुंबातील काका व पुतणे असलेले विलास बाळू नागरे व किशोर संजय नागरे यांनी फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीलाच वांगीची लागवड केली होती.
अवघ्या 15 गुंठ्यात वांग्याच्या शेतीतून मिळवले लाखो रुपये किशोर हा इंजिनिअर(मेकॅनिकल) च्या दुसऱ्या वर्षात असून, चांदवड येथे नेमीनाथ जैन कॉलेजला तो शिक्षण घेत आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने कॉलेजला सुट्ट्या आहेत. या काळात काकांना शेतीत मदत करावी म्हणून त्याने अवघ्या 15 गुंठ्यात वांगी लावली. जिद्द व चिकाटी मनी बाळगून त्याने यातून लाखो रुपये उत्पन्न मिळवले आहे.
हेही वाचा -शरद पवारांबद्दल समाजमाध्यमांवर अक्षेपार्ह मजकूर; भाजप सभापतीविरोधात गुन्हा दाखल
सध्या जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. या काळात अनेक बड्या कंपन्या डबघाईला आल्या, तर अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. शाळा महाविद्यालयात देखील सुट्ट्या आहेत. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील किशोर हा घरीच होता. इंजिनिअरिंग करत असलेल्या किशोरला घरी बसल्या बसल्या काही तरी करावे असे वाटत होते. म्हणून त्याने आपल्या अत्यल्प शेतीला निवडले व काकाला मदत म्हणून त्याने अवघ्या 15 गुंठ्यात वांग्याची शेती केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर कधी लिलाव तर कधी बाजारात हात विक्रीने वांगी विक्री करत त्यांनी आतापर्यंत एक लाखाच्यावर उत्पन्न मिळवले आहे. तर, अजूनही 50 हजारच्यावर उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.
हेही वाचा -VIDEO : कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही फरपट; चक्क जेसीबीने पुरला मृतदेह..
उन्हाळ्यात चांगले संगोपन करत वांगी पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करून वांगे जगवले आहे. कमीत कमी २० हजार रुपये खर्च करून त्यांना लाखो रुपये उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे. मध्यंतरीच्या काळात बाजारही भरत नव्हता. कोरानाचा सार्वधिक फटका हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला होता. पण शेतकऱ्यांनी हतबल न होता यातून योग्य असा मार्ग काढत शिक्षण व शेती असे गणित बसवत या दोन्ही गोष्टींतून यशस्वी वाटचाल केली आहे.
पारंपरिक शेतीला फाटा देत फळभाज्या शेतीत मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते, हे या दोन्ही काका पुतण्याने दाखवून दिले आहे. कमी जागेत कमी खर्चात मोठे उत्पादन घेता येऊ शकते. अशा संकट काळात शेतकऱ्यांनी देखील खचून न जाता नवनवीन प्रयोग करावे, व त्यातून चांगले उत्पन्न मिळवावे जेणेकरून बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये.