नाशिक - साडेतीन शक्ती पीठापैकी आद्यपीठ असणाऱ्या सप्तशृंगी देवीची कोजागिरी पौर्णिमेनिमीत्त रविवारी सकाळी महापुजा करण्यात आली. कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, असलोद, शहादा, सुरत, पेठ येथून तीर्थ कावडीने आणून भगवतीला स्नान घालण्यात आले. संपूर्ण राज्यातून भाविक कोजागिरी पौर्णिमेला गडावर हजेरी लावत असल्यामुळे सकाळी तीन वाजल्यापासूनच मंदिर गाभाऱ्यापासुन ते बाजारपेठेपर्यंत दर्शनासाठी रांग लागली होती.
संपूर्ण राज्यातून तृतीयपंथी सप्तश्रुंगी गडावर आल्यामुळे गड गजबजून गेला होता. त्यांनी शिवालय तलावावर स्नान करून मुख्य तृतीय पंथीयांना कडूनिंबाचा पाला बांधून भगवतीच्या प्रतिमेला विविध अलंकारांनी सजवून तिची सहवाद्य भव्य मिरवणूक काढली. यावेळी लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी झाले. शारदीय नवरात्रीपासून सुरू होणाऱ्या उत्सवाची कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सांगता होत असल्याचे भाविक सांगत आहेत.