नाशिक -येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करीत मनमाड शहरात रविवारपासून खंडोबा महाराज यात्रेला पारंपरिक पद्धतीने उत्साहात सुरुवात झाली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खंडेराव महाराजांची विधिवत पूजा झाल्यानंतर बारा गाड्या ओढण्यात आल्या.
मनमाडला खंडेराव यात्रोत्सवला सुरवात; बारा गाड्या ओढून यात्रा सुरू हेही वाचा -नाशकात 'डर्टी' पाणीपुरीचा भांडाफोड
खंडेराव महाराज यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत बारा गाड्या ओढण्यात आल्या. माघी पौर्णिमेपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव साजरा केला जातो. मनमाड शहरात भगतसिंग मैदान आणि बुधलवाडी या दोन ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत. या दोन्ही ठिकाणी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. या यात्रेचे वैशिष्ठ्य म्हणजे बारा गाड्या ओढणे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला.
हेही वाचा -नाशिकची 'डर्टी' पाणीपुरी: महिलांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया
दरम्यान, हा बारा गाड्या ओढण्याचा मान ज्या व्यक्तीला दिला जातो, त्याला नवरदेव असे म्हटले जाते. आठ दिवस अगोदर त्याला हळद लावली जाते. त्यानंतर हा नवरदेव मंदिरात वास्तव्य करुन राहतो. नवव्या दिवशी हा नवरदेव बारा गाड्या ओढून मंदिरापर्यंत आणतो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त दोन्ही मंदिरांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी दोन्ही मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. यात्रेच्या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांची आणि खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील भक्तांनी यावेळी जत्रेचा आंनद लुटला.