दिंडोरी ( नाशिक ) -तालुक्यात अग्रगण्य असलेल्या व विविध पुरस्कार प्राप्त खेडगाव ग्रामपालिकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खेडगाव करांनी विकासासाठी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करत आदर्श निर्माण केला आहे. लोकमत सरपंच ऑफ द इअर पुरस्कार मिळविणारे विद्यमान उपसरपंच तथा बाजार समिती सभापती, मविप्र संचालक दत्तात्रेय पाटील यांची गेल्या 42 वर्षांपासूनची सत्ता कायम राहिली आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सह विविध विकास पुरस्कार खेडगाव ग्रामपालिकेस मिळालेले आहेत. सतरा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे, दत्तात्रेय पाटील व शिवसेनेचे नेते सुरेश डोखळे, जयराम पाटील यांच्या गटात चुरशीची होण्याची चिन्हे होती. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही गटांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली.
ग्रामपंचायत निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. जास्त प्रमाणत गट तट पडत असल्याने गावाच्या विकासात मोठी अडचण निर्मान होते. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ज्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतींना ग्रामविकास करण्यासाठी मोठा निधी जाहीर केला होता. झिरवळ यांच्या आवाहनाला खेडगाव ग्रामस्थांनी प्रतिसाद देत सन 2021 ते 2026 साठी खेडगाव ग्रामपंचायत बिनविरोध केली.