नांदगांव- नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव कोरोनामुक्त झाले असुन, या गावात आज एकही रुग्ण नसल्याचे ग्रामसेवक व सरपंचानी सांगितले आहे. तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त झाल्याची गावकऱ्यांचे म्हणणे आहे. नांदगांव तालुक्यातील कर्ही हे एकमेव गाव सध्या कोरोनामुक्त आहे. यापुढेही गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी आम्हा काळजी घेऊ असेही गावकऱ्यांनी सांगितले.
शासनाने बांधुन दिलेल्या नियमानुसार केल्या उपाययोजना
एकीकडे कोरोना जगभरात धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे काही ठिकाणी कोरोनाच्या सकारात्मक बातम्या देखील बघावयास मिळत आहेत. नांदगांव तालुक्यातील कर्ही गाव देखील यास अपवाद नाही. आज कर्ही गाव संपूर्ण कोरोनामुक्त झाले आहे. यासाठी गावातील ग्रामस्थांनीही साथ दिली, म्हणून हे शक्य झाल्याचे सरपंच सांगत आहेत. तर शासनाने बांधुन दिलेल्या नियमानुसार आम्ही उपाययोजना केल्या त्यामुळे गाव कोरोनामुक्त करू शकलो, असे ग्रामसेविका सांगत आहेत. कर्ही हे नांदगांव तालुक्यातील 1648 लोकसंख्या असलेले छोटेसे गाव असुन याठिकाणी सर्व समाजातील बांधव गुण्यागोविंदाने राहतात. 2 दिवसाआड गावात औषध फवारणी केली जाते. आशा सेविका व जिल्हा परिषद शिक्षक यांच्यामार्फत गावातील लोकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाते, ऑक्सिमिटरने तपासणी केली जाते, तसेच लसीकरण या सर्व गोष्टीमुळे हे शक्य झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
लग्नसोहळे व धार्मिक कार्यक्रमावर बंदी
शासनाने घालून दिलेले निर्देश आणि आम्ही दाखवलेला मोठेपणा यामुळे गावातील कोरोना पळून गेला असे गावातील लोक म्हणाले. लग्नसोहळे व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली गेली आहे. शासनाने 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करण्यास परवानगी दिली आहे. मात्र आम्ही गावकऱ्यांशी चर्चा करून लग्नसोहळे पुढे ढकलले व गावात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांवर देखील बंदी घातली. यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्यास मज्जाव झाला.