नाशिक - दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या लखमापूर व करंजवण येथील ऊस उत्पादकांनी अध्यक्ष श्रीराम शेटे यांची भेट घेतली. यावेळी कादवा कारखान्याच्या सुरू असलेल्या कामकाजावर समाधान व्यक्त करत परिसरातील सर्व ऊस कारखान्यालाच देण्याचा एकमुखी ठराव केला.
हेही वाचा-अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, हजारो क्विंटल धान भिजले
उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाव देणाऱ्या कादवा सहकरी साखर कारखान्याची गाळप क्षमता 1250 मेट्रीक टन आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या रुपाने टाकण्यात आलेली मशनरी जवळपास आता चांगल्या क्षमतेने काम करत असल्याने गाळप क्षमता वाढली आहे. कादवाच्या इतिहासात रविवारी सर्वोच्च गाळप 2645 मे. टन व उतारा 11.90 टक्के झाला. त्यामुळे करंजवण, लखमापूर, उमराळे येथील ऊस उत्पादक सभासदांनी श्रीराम शेटे यांचा सत्कार केला.
यावेळी ऊस उत्पादकांनी ऊसतोड व लागवड या संदर्भात चर्चा करत विचारविनिमय केला. शेतकऱ्यांच्या अडचणी उपाययोजनांबाबत शेतकी विभागाला सूचना देण्यात आल्या. ऊस तोडणी कार्यक्रमानुसार ऊसतोड करण्याचे सांगण्यात आले. यावेळी संपतराव कोंड, केशवराव बर्डे, भिकन कोंड, राजेंद्र पिंगळे, रामभाऊ बर्डे, बाळासाहेब उदार, तुकाराम बर्डे, यादव बर्डे, विजय कोंड, अशोक आवारे, बाळासाहेब बर्डे, विश्वनाथ बर्डे, संजय बर्डे, विलास बर्डे, रंगनाथ कोंड, रमेश कोंड, संदीप कामाले, विलास जाधव, प्रकाश केदार, शिवाजी दळवी, वसंतराव मोगल,आनंदराव आहेर, पप्पू मोरे, लक्ष्मण बर्डे, अशोक खराटे, रमेश जाधव, रंगनाथ कोरडे हे ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.
कादवा कारखान्याने गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे ही वास्तू जिवंत आहे. राजकारण बाजूला ठेऊन कारखान्याला आवश्यक उसाचा पुरवठा करणे गरजेचे आहे, असे ऊस उत्पादक करंजवण विलास जाधव यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षांपासून जी मशीनरी बदलणे गरजेची आहे ती आधुनिक व जास्त क्षमतेची टाकत गेल्याने आज जवळपास संपूर्ण आधुनिकरण पूर्ण झाल्यासारख्येच असल्याने गाळप क्षमता 2500 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे वेळेत ऊस तुटून कमी वेळेत जास्त गाळप करणे शक्य होणार आहे. कादवा उसाला सर्वाधिक भाव देण्यासाठी कटिबद्ध असून सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून पुरेसा ऊस उपलब्ध करून द्यावा, असे कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले.