नाशिक Satyashodhak Film : समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य ‘सत्यशोधक’ हा चित्रपट नवीन वर्षात रिलीज होत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या टिझरमुळे आणि म. ज्योतिराव-सावित्रीबाई यांच्या लुकमुळं चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. आता हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नाशिक भेटीदरम्यान सत्यशोधक चित्रपटाच्या टिमने नाशिककरांशी संवाद साधला.
‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस: आज समाजातील महिला वेगवेगळ्या उच्च पदांवर बेधडकपणे काम करतात. याचं सर्व श्रेय क्रांतीज्योती ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांनाच जातं. त्यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात ज्योतिरावांच्या भूमिकेत अभिनेते संदिप कुलकर्णी दिसतील, तर सावित्रीमाईंच्या भूमिकेत अभिनेत्री राजश्री देशपांडे दिसणार आहे. या दोघांच्या हुबेहुब लुकमुळं प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडेंसह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी, अनिकेत केळकर, अमोल बावडेकर, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील.