सटाणा (नाशिक ) -सटाणा तालुक्यातील अंबासन येथील पत्रकाराने वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून येथील सरपंच व त्याच्या साथीदारांनी स्थानिक पत्रकाराला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.
सरपंचाची मुजोरी.. विरोधात बातमी प्रसिद्ध केली म्हणून पत्रकाराला जबर मारहाण - नाशिकमध्ये पत्रकाराला मारहाण
सटाणा तालुक्यातील अंबासन येथील पत्रकाराने आपल्या विरोधात वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून येथील सरपंच व त्याच्या साथीदारांनी स्थानिक पत्रकाराला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.
सटाणा तालुक्यात अंबासन या ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याची बातमी पत्रकार दीपक खैरनार यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. मात्र, आपल्या विरोधात ही बातमी असल्याचा राग मनात धरून सरपंच जितेंद्र अहिरे व त्याच्या इतर साथीदारांनी खैरनार यांना शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाणीत त्यांना दुखापत झाल्याने नामपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी खैरनार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सरपंच जितेंद्र अहिरे याला अटक केली आहे. प्रत्येक घटनेची वास्तव माहिती समाजापर्यंत पोहचवण्याचे काम पत्रकार करतो. मात्र अशा घटनांमधून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेवरच घाला घातला जात असल्याने पत्रकार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.