नाशिक - मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण ६५ टक्के भरले असून मेंढिगिरी समितीच्या निकषानूसार आता नाशिक व नगरमधील धरणांमधून पाणी सोडणे आता बंधनकारक नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला दिलासा मिळला आहे. जिल्ह्यातील धरणात ८० टक्के जलसाठा उपलब्ध असून वर्षभराचा पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी सिंचन व उद्योगांसाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
आता नाशिक व नगरमधील धरणांमधून पाणी सोडणे बंधनकारक नाही -
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यावर जलसंकटाचे ढग गडद झाले होते. जिल्ह्यातील धरणांत अवघा ६९ टक्के जलसाठा शिल्लक होता. वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता जरी मिटली असली तरी सिंचन व उद्योगासाठी पाणी आरक्षित ठेवणे शक्य नव्हते. त्याहून मोठे संकट म्हणजे जायकवाडी धरणात जेमतेम ५० टक्के जलसाठा होता. मेंढिगरी समितीच्या शिफारशीनुसार जायकवाडी धरणात ६५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्यास नाशिक व नगरमधील धरणांतून पाणी सोडणे बंधनकारक आहे. पावसाने दिलेली ओढ व जिल्ह्यातील धरणातील उपलब्ध जलसाठा बघता मराठवाड्याला पाणी सोडणे अशक्य ठरले असते. मात्र पावसाने ऑगस्टची कसर सप्टेंबरच्या प्रारंभी भरुन काढली.