नाशिक Jarange Patil Offer To Ajit Pawar :अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडताना काळजी घेण्याची तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर आता आरक्षणाचीही तंबी देऊन टाका. लगेच आरक्षण दिलं तर मी नाशिक मधूनच घरी जातो आणि तुमच्या सत्कारासाठी ट्रक भर गुलाल आणि फुलं आणतो, मराठ्यांची लाखो पोरंही आणतो. आणखी काय सन्मान पाहिजे तुम्हाला? अशी ऑफर मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना दिली आहे. जरांगे पाटील नाशिकला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. (Maratha Reservation Issue)
मराठा आरक्षणावरून अजित पवारांची बैठक :मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी राज्यभर ठिकठिकाणी सभा घेत आक्रमक आंदोलन उभं केलं आहे. या मागणीला विरोध केल्यानं राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील असा संघर्ष निर्माण झाला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात वातावरण तापू लागल्यानंतर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शासकीय देवगिरी या निवासस्थानी त्यांच्या गटातील आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाबाबत जपून बोलण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच, अजित पवारांना खास ऑफर दिली. तुम्ही आरक्षण दिलं तर मी नाशिक मधूनच घरी जातो आणि तुमच्या सत्कारासाठी ट्रकभर गुलाल आणि फुलं आणतो, मराठ्यांची लाखो पोरंही आणतो, आणखी काय सन्मान पाहिजे तुम्हाला, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलयं.