नाशिक- नांदगाव शहरासह तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या मालेगाव शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे, शहरासह सीमा परिसरात कोरोनाचे संक्रमण वाढू नये, यासाठी आज महाराष्ट्र दिनापासून ते ३ मेपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. जनता कर्फ्यूमध्ये वैद्यकीय सेवा, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील, असे आवाहन नांदगाव नगरपरिषदेच्या मुख्यधिकारी डॉ. श्रेया देवचके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
नांदगाव शहरासह तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या मालेगाव शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता तसेच येवला येथील कोरोनाबाधित व मनमाड येथील कोरोनाबाधितांचा आलेला संपर्क लक्षात घेता नांदगाव शहर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नांदगाव शहरात आज महाराष्ट्र दिनापासून ते ३ मेपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
या कालावधीत शहरात अत्यावश्यक सेवांमध्ये रुग्णालय तसेच खासगी दवाखाने, मेडिकल सुरू राहतील. प्रशासनाच्या वतीने इतर दुकाने बंद राहणार असून दूध विक्री सकाळी ८ ते १० तर सायंकाळी ६ ते ८ पर्यंत सुरू राहील. तसेच घरपोच गॅस सेवा देखील सुरू राहील. जनता कर्फ्यू काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नका, नगरपरिषदेच्या आवाहनाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुख्यधिकारी डॉ. देवचके यांनी केले आहे.
दरम्यान, नांदगांव तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, मात्र तो होऊ नये यासाठी या सर्व उपाययोजना सुरू असून तालुक्याच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे, सध्यास्थितीत एकही रुग्ण नाही, मात्र काळजी घेतली नाही तर कोरोना कधीही तालुक्यात डोके वर काढू शकतो हे मात्र नक्की.
हेही वाचा-मालेगाव महापालिकेतील ३३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आयुक्तांनीच केली होती तक्रार