नाशिक- देशाला हादरून देणाऱ्या निर्भया प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने चारही नराधमांच्या फाशीच्या शिक्षेची तारीख निश्चित केली आहे. सात वर्षानंतर निर्भयाच्या कुटुंबला न्याय मिळला असून हा निकाल जर लवकर लागला असता तर मुलींवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तींवर जरब बसला असता, अशा प्रतिक्रिया नाशिकच्या महिला वर्गाने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केल्या.
देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशात सरकारने शाळा आणि महाविद्यालयात मुलींना स्वरक्षणाचे धडे देणे बंधनकारक केले पाहिजे, असे महिलांनी म्हटले आहे. याद्वारे वेळ पडल्यास कोणाच्या मदती शिवाय महिलांना आत्मरक्षा करता येईल. त्याचबरोबर, मुलांना महिला सन्मानाचे धडे देखील दिले पाहिजे, असे महिलांनी सांगितले. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टात लावण्यात येतो. मात्र, यातसुद्धा न्यायालयाकडून अनेक तारखा दिल्या जात असल्याने पीडित महिलेला न्याय मिळण्यास उशीर होतो, असे महिलांचे म्हणणे आहे.